डिझेल, टायर सह अन्य गोष्टींच्या भाव वाढीमुळे बस व कारच्या भाडेदरात १२ ते १५ टक्क्यांची वाढ

पुणे : डिझेलने ओलांडलेली शंभरी, टायर, बॅटरी, स्पेअर पार्ट्स व अन्य आवश्यक गोष्टींच्या वाढलेल्या किंमती, टोल व करांमध्ये झालेली वाढ यामुळे नाईलाजाने बस आणि कारच्या भाडेदरात १२ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारने बस व कारवरील करांमध्ये सूट द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे राज्यव्यापी अधिवेशन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. म्हात्रे पुलाजवळील सिद्धी गार्डन येथे झालेल्या या सभेवेळी असोसिएशनचे सचिव तुषार जगताप, खजिनदार दिनेश सोनवणे, कार्याध्यक्ष किरण देसाई, सल्लागार अनंत पुराणिक, जिल्हा शालेय सुरक्षा समितीचे सचिन पंचमुख आदी उपस्थित होते. राज्यभरातून जवळपास ५००-६०० बस आणि कार मालक या अधिवेशनासाठी उपस्थित होते.
राजन जुनवणे म्हणाले, "पुण्यात छोट्या-मोठ्या अशा जवळपास १६००० बसेस असून, १००० पेक्षा अधिक बस व कारमालक असोसिएशनचे सभासद आहेत. कोरोना काळात जवळपास १९ महिने गाड्या जागेवर उभ्या होत्या. त्यामुळे व्यवसाय आधीच डबघाईला आलेला असताना, त्यात डिझेल, टायर, बॅटरी आणि स्पेअर पार्ट्स यासारख्या आवश्यक वस्तूंच्या किमती २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. परिणामी, गाड्यांची देखभाल व दुरुस्ती करणे जिकिरीचे होत आहे. त्यामुळे आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला."
"कोरोनाच्या या काळात १३ सीटर ते ४९ सीटर बस, स्कुल बस, व्होल्वो, इंटरसिटी बसेस, कार सगळ्यांनाच मोठा फटका बसला आहे. राज्य शासनाने किंवा परिवहन विभागाने याची कसलीही दखल घेतलेली नाही. अनेक गाड्यांवर बँकांची, फायनान्स कंपन्यांची कर्जे आहेत. त्याचे हप्ते फेडणे अवघड झालेले आहे. अशावेळी ही भाडेवाढ करणे क्रमप्राप्त होते. ही दरवाढ प्रवाशांना भुर्दंड म्हणून नाही, तर आम्हा बस व कार व्यावसायिकांना पुन्हा व्यवसायात सावरता यावे, यासाठी आहे," असे किरण देसाई म्हणाले.
------------------
नव्या कार्यकारिणीची निवड
पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवड या सर्वसाधारण सभेत झाली. यामध्ये अध्यक्षपदी राजन जुनवणे, उपाध्यक्षपदी सुनील मोरे, सचिवपदी तुषार जगताप, खजिनदारपदी दिनेश सोनवणे, कार्याध्यक्षपदी किरण देसाई, सल्लागारपदी अनंत पुराणिक यांची निवड करण्यात आली.
------------------
बस व कारमालकांसाठी सुरक्षाबंधन
कोरोनानंतर सभासदांमध्ये आलेली मरगळ झटकावी, त्यांच्यातील नैराश्य दूर व्हावे व पुन्हा जोमाने व्यवसायाला सुरुवात करावी, या उद्देशाने पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनच्या वतीने सुरक्षाबंधन या विशेष कार्यक्रमांचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन, भेटीगाठी व सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन आदीनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
-------------------
अशी आहे प्रस्तावित बस भाडेवाढ
बस/गाडीचा प्रकार - किमी प्रमाणे दर (नॉन-एसी) किमी दर (एसी)
- १३ सीटर - लागू नाही - २४ रुपये
- १७ सीटर - २३ रुपये - २८ रुपये
- २० सीटर - २५ रुपये - ३० रुपये
- २७ सीटर - लागू नाही - ५० रुपये
- ३२ सीटर - ३३ रुपये - लागू नाही
- ३५ सीटर - ३६ रुपये - ५२ रुपये
- ४१ सीटर - ४१ रुपये - ६० रुपये
- ४५ सीटर - ४७ रुपये - ६५ रुपये
- व्होल्वो - लागू नाही - ९० रुपये
- ४९ (३*२) - ४५ रुपये - लागू नाही
- ५३ (मल्टी) - लागू नाही - ११० रुपये