गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार - रूपाली चाकणकर

मुंबई - घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली असून रविवारी (२७ डिसेंबर) संपूर्ण राज्यभर जिल्हानिहाय आंदोलने करणार असल्याची घोषणा महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केली आहे.
मुंबईसह महाराष्ट्राच्या सर्व जिल्हयामध्ये आंदोलन करुन केंद्रसरकारला कडक शब्दात जाब विचारावा असे आवाहनही महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी महिला पदाधिका-यांना केले आहे.
गॅस सिलेंडरच्या दरातील वाढ ही गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक असून त्याच्याबरोबर पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. दरवाढीचा हा त्रास गृहिणींनाच जास्त होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्रसरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे. त्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम केंद्रसरकार जाणीवपूर्वक करत आहे असा आरोपही रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
सरकारने रेशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद केल्याने गरीब व मध्यमवर्गीय जनतेला गॅस सिलेंडरशिवाय पर्याय उरलेला नाही. खुल्या बाजारातील रॉकेल ७० रुपये प्रतिलिटरने खरेदी करावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे आक्रमकपणे सर्व महिलावर्गाने हे आंदोलन दिल्लीच्या दरबारी पोहोचवावे असेही रुपालीताई चाकणकर यांनी महिला पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे.