विज्ञान रंजन स्पर्धेत ग्रामीण महिलांची बाजी

ज्योती कोरटकर प्रथम, रीमा लिओ रॉड्रिग्ज द्वितीय
 
विज्ञान रंजन स्पर्धेत ग्रामीण महिलांची बाजी
अरुण फिरोदिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण

पुणे: "ग्रामीण भागात ज्ञानाचे भांडार आहे. प्रत्यक्ष जीवनातून विज्ञान जगणारी माणसे पू़र्वी होती. शेतकरी विविध प्रकारची पिके एकावेळी लावून कीड नियंत्रण करू शकत होता. त्याला रासायनिक कीटकनाशक वापरण्याची गरज भासत नव्हती. त्याचे ज्ञान मराठीत होते. मराठीत परंपरेने आलेले मोठे ज्ञान आहे. पण इंग्रजी माध्यमाच्या हट्टापायी आपण ते ज्ञान गमावून बसत आहोत,” असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी केले.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्ताने आयोजित केलेल्या विज्ञान रंजन स्पर्धा 2021 च्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेंद्रकुमार सराफ होते. विनय र. र., मोहन सावळे, संजय मा. क., शशी भाटे, नंदकुमार कासार, सुजाता बरगाले व अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत चिखली येथील ज्योती हेमंतकुमार कोरटकर यांना प्रथम, पुण्यातील शालेय विद्यार्थिनी रीमा लिओ रॉड्रिग्ज हिचा द्वितीय, तर तृतीय क्रमांक चिखली येथील साधना दत्तात्रय खुळे यांना मिळाला. अंतिम फेरीत अठरा बक्षीस विजेत्याची जणांची निवड करण्यात आली होती. सर्व विजेत्यांना इरा लिमये स्मृती निधीतून रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि पुस्तके देऊन गौरविण्यात आले. 

अरूण फिरोदिया म्हणाले, "नव्याने काही तरी शिकले पाहिजे तर आपली आणि देशाची प्रगती होईल. मराठीत विज्ञानाचे शब्द आणले पाहिजेत. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः शिकून त्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे, प्रत्येक गोष्टीमागील विज्ञान शोधणे आवश्यक आहे. फक्त एकच काम न करता, सर्वकामे पद्धतशिरपणे करायला शिका." लुनाची रचना करत असताना रस्त्यावरच्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या साध्या मेकॅनिक गॅरेजवाल्यांकडून त्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती मिळवून लुना कशी घडवली याची प्रेरक माहिती ही त्यांनी सांगितली.

"महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून उत्तुंग प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. या स्पर्धेत ८५८ जणांनी सहभाग नोंदवला. नेहमीप्रमाणे विद्यार्थी वर्गाचा प्रतिसाद मोठा असला, तरी यावर्षी प्रौढांचा प्रतिसाद विशेष उल्लेखनीय होता. शेतीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील स्पर्धक सर्वाधिक होते. काही महिला स्पर्धकांनी आपण गृहिणी असल्याचा आवर्जून उल्लेख केला. प्राथमिक फेरीतील 54 विजेत्यांची अंतिम प्रयोग फेरीसाठी निवड करण्यात आली. त्यांना विविध प्रकारचे दहा प्रयोगांची वैज्ञानिक पडताळणी दोन तासात करण्याचे आव्हान देण्यात आले. त्याशिवाय त्यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या," असे राजेंद्रकुमार सराफ म्हणाले. 

विज्ञान रंजन स्पर्धेचे आयोजक विनय र. र. यांनी स्पर्धेबद्दल माहिती सांगितली. सुनील पोटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रविन्द्र सोमण, विवेक एरंडे, उदयन साठे, विवेक शिळीमकर, दीपक आडगावकर, प्राची चिंचोलकर, मीना मेहेंदळे, ज्योत्स्ना सराफ, गीताश्री मगर, अमेय परदेशी, भारत सावळवाडे, डॉ. धुळे इत्यादींनी स्पर्धा परिक्षणाचे काम पाहिले. शशी भाटे, संजय मा. क. यांनी स्पर्धा व्यवस्थापनाचे काम पाहिले.

सविस्तर निकाल

प्रथम क्रमांक - रु. 5000/- रोख, प्रशस्तीपत्र आणि पुस्तके

ज्योती हेमंतकुमार कोरटकर -चिखली

द्वितीय क्रमांक - रु. 3000/- रोख, प्रशस्तीपत्र आणि पुस्तके

रीमा लिओ रॉड्रीग्ज - पुणे

तृतीय क्रमांक - रु. 2000/- रोख, प्रशस्तीपत्र आणि पुस्तके

साधना दत्तात्रय खुळे - चिखली

उत्तेजनार्थ रु. 1000/- रोख, प्रशस्तीपत्र आणि पुस्तके

तन्वी शशिकांत मगदूम - कोल्हापूर

वैशाली विवेक नरवडे - डुडुळगाव

विशाखा परशराम आरेकर - कराड

सुमन बापूसाहेब मुखेकर - चिखली

रुपाली नितीन नीळकंठ - चिखली

स्फुर्तिवर्धक - रु. 500/- रोख, प्रशस्तीपत्र आणि पुस्तके

वैभव अंगद कांबळे - चिखली

जैनील धर्मेश जैन - पुणे

सानिका रविंद्र शिंदे - चिंचवड

श्रुतिका कलगोंडा पाटील - कोल्हापूर

तनिष हेमंत चंगेडिया - पुणे

ओंकार सूचित मुदंडा - पुणे

अक्षदा अधिक कदम - सातारा

अक्षय सुहास कुलकर्णी - नाशिक

हितांशी मनीषकुमार शहा - पुणे

प्रसाद बाळू नेवाळे - चिखली

From Around the web