कोरोनामुळे जग सर्वार्थाने बदलले - शेखर गायकवाड

पुणे : "लॉकडाऊनच्या काळात प्रशासनात काम करताना प्रचंड अनुभव आले. समाजातील विविध घटकांवर अनेक परिणाम झाल्याचे जवळून पाहिले. या काळात गरिबांचा कोंडमारा झाला, तर श्रीमंतांचा गर्व उतरला. टोकाची संवेदनशीलता, तर टोकाची अमानुषताही या काळात दिसली. कोरोनामुळे जग सर्वार्थाने बदलले असून, नवीन जीवनपद्धती निर्माण होत आहे. या महामारीने माणसाला जीवनाचा धडा शिकविला आहे,'' असे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.
न्यू एरा पब्लिकेशन हाऊस व उचित माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानेश्वर जाधवर लिखित 'लॉकडाऊन' कादंबरीचे प्रकाशन शेखर गायकवाड यांच्या हस्ते झाले. पत्रकारभवन येथे झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत उल्हास पवार होते. प्रसंगी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी विभागप्रमुख, समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे, लेखक व प्रकाशक शरद तांदळे, लेखक ज्ञानेश्वर जाधवर, विद्यार्थी सहायक समितीचे विश्वस्त गणेश कळसकर, उचित माध्यमचे जीवराज चोले आदी उपस्थित होते.
शेखर गायकवाड म्हणाले, "पालिकेचा आयुक्त म्हणून काम करताना आपत्ती व्यवस्थापनात आपल्याला खूप शिकण्याची गरज आहे, हे लक्षात आले. संकटकाळात लोकांनीही कसे वागावे, याचे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. अनेकांचे रोजगार गेले, उद्योगात नुकसान झाले, आरोग्याच्या सुविधांपासून वंचित राहावे लागले. घरात बसून कोंडमारा झाला. पण यातून काहीनी सकारात्मक दृष्टीकोनातून विविध साहित्यकृती निर्मिल्या. नवे शिक्षण घेतले. 'वर्क फॉर्म होम'सारख्या संकल्पनेमुळे लोक ग्रामीण भागाकडे वळायला लागली. आपली संस्कृती, कुटुंबातील सदस्य नव्याने समजायला लागले. 'लॉकडाऊन' कादंबरी या सगळ्याचे दर्शन घडविणारी आहे."
उल्हास पवार म्हणाले, "वास्तवाचे सामाजिक भान शब्दबद्ध करणारी ही कादंबरी आहे. 'लॉकडाऊन'मधून अचानक ओढवलेल्या संकटाचा सामान्य माणसांच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला, याचे वर्णन अतिशय संवेदनशील आणि ओघवत्या स्वरूपात केले. आहे. गावात, समाजात घडणाऱ्या घटनांचा मागोवा, यादरम्यान आलेले चांगले आणि वाईट अनुभव, संवेदनशील व संवेदनशील अशा दोन्ही मनोवृत्तीचे दर्शन विस्ताराने घडवले आहे. वंचितांना मदतीचा हात देणाऱ्या सेवाभावाचे, माणुसकीचे दर्शन यातून होते."
प्रा. रणधीर शिंदे म्हणाले, "खेड्यातून आलेल्या ज्ञानेश्वर जाधवर याने निर्मिलेली ही साहित्यकृती अनुभवसंपन्न आहे. 'लॉकडाऊन'मध्ये सर्वजण बंदिस्त असताना परिस्थितीवर रडत न बसता याच काळाचे मापन, नातेसंबध, विचारसंबध यांची बदलती परिभाषा त्यांनी टिपली. भिडस्तपणे बारकाईने भवताल टिपत त्याला कादंबरीत उतरवण्याचे आव्हान ज्ञानेश्वरने पेलले. समकालीन दस्तावेज़ मांडणारी ही महत्त्वाची कादंबरी आहे."
ज्ञानेश्वर जाधवर यांनी कादंबरीच्या लेखनामागील भूमिका व प्रवास सांगितला. प्रत्येकाने अनुभवलेला लॉकडाऊन कथानकात आला आहे. समकालीन विषयावरची ही कादंबरी पुढील शंभर वर्ष चालेल, असे मत शरद तांदळे यांनी प्रास्ताविकात मांडले. लक्ष्मण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. शुभांगी गायकवाड यांनी आभार मानले.