शिवाजी महाराज हे सावधान, दक्ष व सम्यक या गुणांचा अंगीकार असलेले व्यक्तीमत्त्व

पुणे : भगवान श्रीकृष्णानंतर सदैव सावधान, दक्ष व सम्यक या गुणांचा अंगीकार असलेले नजीकच्या इतिहातील एकमेव व्यक्तीमत्त्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. महाराज हे सर्वांचेच असून सर्व भाषांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्व समजावून सांगितले गेले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र भूषण व पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
पुण्यातील सारस अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचा ५० वा वर्धापन दिन व देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात पुरंदरे यांचे शंभराव्या वर्षांत पदार्पण व महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब अनास्कर यांची नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते पुरंदरे व अनास्कर या दोहोंचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी सभागृहात संपन्न झाला.
पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष गणेश धारप, उपाध्यक्ष दत्तात्रय गोडबोले, संचालक शरद पायगुडे, संस्थेचा कर्मचारी वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमा दरम्यान पतसंस्थेतील महिला कर्मचा-यांच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांचे १०० दिव्यांच्या माध्यमातून औक्षण करण्यात आले तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ५० वर्षांत सारस अर्बन या पतसंस्थेने केलेल्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडणा-या पुस्तिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले.
या वेळी बोलताना पुरंदरे म्हणाले, “शिवचरित्र करमणूकीसाठी नाही तर शिकण्यासाठी आहे, याची जाणीव असायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांना अवघे ५० वर्षांचे आयुष्य लाभले, मला १०० वर्षांचे लाभले. पण माझ्या १०० वर्षांच्या आयुष्यात देखील मला महाराज पूर्ण समजले असा दावा मी करू शकत नाही.” शंभरीकडे वाटचाल करताना मी सध्या म्हातारपण आणि बाल्यावस्था कसे सारखेच असतात याचा अनुभव घेतो आहे असे सांगत आपण सारस अर्बन या पतसंस्थेसाठी सुमारे पाऊण कोटी रुपयांच्या ठेवी मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचेही पुरंदरे यांनी नमूद केले.
स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज जसे समाजवादी, मानवतावादी, सर्वधर्मसमभावाचे पालन करणारे होते, तसेच ते हिंदू राष्ट्राच्या उत्थानासाठी देखील कार्यरत होते. शिवाजी महाराज हे आपल्या राष्ट्राचा संजीवनी बीजमंत्र आहेत. स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या अनेकांनी शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली. आजच्या घडीला शिवाजी महाराजांचे खरे भक्त किती आणि त्यांच्या नावाची झूल पांघरून निवडणुकांसाठी वापर करणारे किती हा विचार करणे आणि जागे राहणे महत्त्वाचे आहे.
प्रेरणादायी शिवचरित्र अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचावे यासाठीच बाबासाहेबांना परमेश्वराने १०० वर्षांचे आयुष्य दिले असे सांगून गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, विद्यार्थी दशेत असताना छत्रपती शिवाजी महाराज या थोर व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याबरोबरच त्यांच्या मनात ते कायमस्वरूपी विराजमान होण्याचे संपूर्ण श्रेय हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनाच जाते.