करदात्यांनी 'विवाद से विश्वास'चा लाभ घ्यावा

पुणे : प्राप्तिकर विभागामार्फत करदात्यांच्या सोयीसाठी आयोजिलेल्या 'विवाद से विश्वास' योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. करदात्यांपर्यंत पोहचुन त्यांच्या समस्या व शंका निरसन केले जात आहे. या योजनेंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत प्राप्तिकर भरण्याची सुवर्ण संधी आहे. त्याचा अधिकाधिक करदात्यांनी लाभ घेऊन प्राप्तिकर वेळेत जमा करावा," असे आवाहन पुणे प्राप्तिकर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त श्रीमती छवी अनुपम यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि प्राप्तिकर विभाग पुणेच्या वतीने बिबवेवाडी येथील 'आयसीएआय' भवन येथे 'विवाद से विश्वास'वर आयोजित जनजागृती कार्यक्रमात अनुपम बोलत होत्या. प्रसंगी प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिकारी सतींदर सिंग राणा, रिना झा त्रिपाठी, केपीसी राव, राजीव कुमार, राजर्षी द्विवेदी यांनी मार्गदर्शन केले. 'आयसीएआय'च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सीए यशवंत कासार, उपाध्यक्ष सीए समीर लड्ढा, सचिव व खजिनदार काशिनाथ पाठारे आदी उपस्थित होते.
सीए, कर सल्लागार, करदाते, व्यापारी संस्था, व्यावसायिक आदींनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष, तसेच ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. यावेळी प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करदात्यांच्या विविध तांत्रिक अडचणींचे निरसन केले. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशच्या माध्यमातून प्राप्तिकर जमा करण्यासंदर्भातील आवश्यक माहिती दिली. करदात्यांना येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्राप्तिकर विभाग (इन्कम टॅक्स डिपार्टमेंट) यांच्या वतीने विविध ठिकाणी 'विवाद से विश्वास' शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात करदात्यांच्या अडचणी सोडविण्यात आल्या.
छवी अनुपम म्हणाल्या, ''करदात्यांद्वारे मिळणारा प्राप्तिकर भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंधन आहे. 'विवाद से विश्वास' ही योजना करदात्यांसाठी चांगली संधी आहे. करदात्यांना केवळ कर भरायचा असून, व्याज (इंटरेस्ट) किंवा दंड माफ होणार आहे. सनदी लेखापालांनी ही योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्यात पुढाकार घ्यावा. करदात्याच्या शंका निरसनासाठी प्राप्तिकर विभागातील अधिकारी तत्पर आहेत.'' सतींदर सिंग राणा म्हणाले की, ऑनलाईन पद्धतीमुळे करभरणा, तसेच अडचणींचे निराकरण करणे सोपे झाले आहे.
चितळे म्हणाले, "कर भरणे हे 'इमेज बिल्डिंग'च्या दृष्टीने महत्त्वाचे असते. यामुळे प्रतिष्ठा, विश्वासार्हता निर्माण होते, व्यावसायिकांना यामुळे खूप फायदा होतो." सीए अभिषेक धामणे म्हणाले, "प्राप्तिकर विभाग, करदाते आणि सनदी लेखापाल हे 'विवाद से विश्वास' योजनेचे तीन महत्वाचे आधारस्तंभ आहेत. तिघांच्या एकत्रित प्रयत्नातून योजनेला यशस्वी करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा आहे." सीए काशिनाथ पाठारे यांनी सूत्रसंचालन केले. सीए अभिषेक धामणे यांनी प्रास्ताविक केले. सीए अनिल चिकोडी यांनी आभार मानले.