'दगडूशेठ' च्या श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना मुख्य मंदिरात साधेपणाने संपन्न  

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते सकाळी १० वाजून २३ मि. प्रतिष्ठापना 
 
a
 मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

पुणे : मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने निवडक विश्वस्तांच्या उपस्थितीत आणि ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी हा सोहळा साधेपणाने संपन्न झाला. उत्सवकाळात देखील मंदिर बंद राहणार असल्याने कार्यकर्ते मंदिरात दर्शनासाठी जाणार नसल्याचा मोठा निर्णय ट्रस्टतर्फे यंदाही घेण्यात आला आहे.
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी गणेश चतुर्थीला सकाळी श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण आदी उपस्थित होते. वेदमूर्ती मिलींद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा पार पडला. उत्सवकाळात देखील मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत.
 
गणेश चतुर्थीच्या दिवशी आलेल्या भाविकांनी मंदिरावरील आकर्षक विद्युतरोषणाई पाहण्यासोबतच रस्त्यावरुन बाहेरुनच दर्शन घेत कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, अशी श्रीं ची चरणी प्रार्थना केली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये व आॅनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.  

1

यंदाचे वैशिष्टय - आॅगमेंटेंड रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानाचा वापर

आॅगमेंटेंड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानाचा वापर हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्टय आहे. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त भक्तांनी आॅनलाईन दर्शन घ्यावे, याकरीता या तंत्राचा वापर करण्यात येत आहे. याकरीता ट्रस्टतर्फे दिलेल्या http://www.DagdushethGanpati.net या लिंकवर जाऊन घरी भक्ताने आरती करतानाचा व्हिडिओ काढल्यास प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात श्रीं ची आरती करतानाचा व्हिडिओ तयार होणार आहे. आपण गाभा-यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करीत असल्याचा आनंद व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येईल.

ॠषीपंचमीनिमित्त आॅनलाईन अथर्वशीर्ष पठण

यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नसल्याने ट्रस्टने आॅनलाईन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ऋषीपंचमीनिमित्त शनिवार, दिनांक ११ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता अथर्वशीर्ष पठण सोहळा आॅनलाईन पद्धतीने होईल. ट्रस्टच्या फेसबुक पेज, इंस्टाग्राम याद्वारे या उपक्रमाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे.

श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.


 

From Around the web