शालेय तरुणांची साहित्यकृती कौतुकास्पद 

दत्तात्रय जगताप यांचे मत; तन्वी निमजे लिखित 'ऍस्ट्रो ऑफ अवर्स'चे प्रकाशन
 
शालेय तरुणांची साहित्यकृती कौतुकास्पद

पुणे : "शालेय वयातील मुले कादंबरीसारखा साहित्य प्रकार लिहिताहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. एवढ्या कमी वयात सर्जनशीलतेचे, प्रगल्भतेचे दर्शन आपल्या लेखनातून तन्वीसारखे युवा लेखक घडवतात, तेव्हा त्यांच्यातील आत्मविश्वास पाहून हुरूप येतो. तन्वीने आपल्या अंतर्मनातील विचारांना सुंदर पद्धतीने शब्दबद्ध केले आहे. तिचे लेखन कौतुकास्पद आणि नव्या पिढीला लिहिण्यास उद्युक्त करणारे आहे," असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले.

तन्वी निमजे लिखित अभिषेक टाईपसेटर्स अँड पब्लिशर्स प्रकाशित 'ऍस्ट्रो ऑफ अवर्स' पुस्तकाच्या प्रकाशनावेळी जगताप बोलत होते. मंगळवारी नवी पेठेतील पत्रकारभवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला इंडियन बँकेचे विभागीय व्यवस्थापक मनीष कुमार, उपविभागीय व्यवस्थापक राजीव रंजन, सह-महाव्यवस्थापक रणजित सिंग, वरिष्ठ व्यवस्थापक वजाहत अली व तन्वीचे वडील सह-महाव्यवस्थापक प्रकाश निमजे, आई ज्योती निमजे, प्रकाशक मंगेश वाडेकर आदी उपस्थित होते.

दत्तात्रय जगताप म्हणाले, "दहावी-बारावीच्या दडपणात अनेकदा मुले गुंतून जातात. मात्र, तन्वीने त्यातून स्वतःला वेळ देत 'ऍस्ट्रो ऑफ अवर्स' कादंबरी लिहून पूर्ण केली. तिच्यातील लेखन प्रतिभा अचंबित करणारी आहे. काव्य, भावभावना अतिशय ओघवत्या शैलीत तिने उतरवल्या आहेत. इतर मुलांनीही यातून प्रेरणा घेत साहित्यकृती निर्माण कराव्यात."

मनीष कुमार म्हणाले, "तन्वीला लहानपानापासून पाहत आहे. तिच्यातील बुद्धिमत्ता आणि क्रयशीलता, सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची तिची उर्मी वाखाणण्याजोगी आहे. अवघ्या १८ व्या वर्षी तिची कादंबरी प्रकाशित होत आहे, ही तिच्यासाठी मोठी गोष्ट आहे." तन्वी निमसे म्हणाले, "लहानपणापासूनच वाचन करत होते. त्यातून लिखाणाची आवड जडली. दहावीनंतर सर्व पुस्तक लिहून काढले. पहिले पुस्तक प्रकाशित होताना आनंद वाटतो आहे."

मंगेश वाडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सतीश गेजगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश निमसे यांनी आभार मानले.

From Around the web