नजीकचा काळ हा साखर उद्योगासाठी आव्हानात्मक काळ

-    कर्नाटक सरकारचे मोठे आणि मध्यम उद्योग विभाग मंत्री मुरुगेश निरानी यांचे प्रतिपादन 
 
a
-    डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्टस् असोसिएशन (डीएसटीए) चे ६६ वे वार्षिक अधिवेशन पुण्यात संपन्न 
-    यंदाच्या वर्षीचे साखर उद्योग गौरव तसेच जीवन गौरव पुरस्कार प्रदान 

पुणे : आधी कर्नाटकात गाळप हंगाम हा तब्बल ९ महिने चालत असे. मात्र आता उत्तर कर्नाटकसारख्या भागात ओढून ताणून हा हंगाम केवळ १०० दिवसांवर आला आहे. यामुळे या क्षेत्रात टिकून राहणे आणि एफआरपीप्रमाणे किंमत देणे हे दिवसेंदिवस अवघड होत असल्याने नजीकचा काळ हा साखर उद्योगासाठी आव्हानात्मक काळ असल्याचे प्रतिपादन कर्नाटक सरकारचे मोठे आणि मध्यम उद्योग विभाग मंत्री मुरुगेश निरानी यांनी केले. कर्नाटकात आम्ही इथेनॉल सोबतच बाय प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात उत्पादित करीत असल्याने एफआरपी पेक्षा २०० ते ३०० रुपये भाव देणे आम्हाला शक्य होत आहे. मात्र भविष्यात हे आणखी कठीण होत जाईल असा आमचा अंदाज असल्याचेही त्यांनी नमूद केले. 


शेठ वालचंद हिराचंद यांनी १९३६ साली साखर उद्योगाशी संबंधित नवीन तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे व त्याचा फायदा सर्वांना व्हावा या उद्देशाने स्थापन केलेल्या डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्टस् असोसिएशन (डीएसटीए) चे ६६ वे वार्षिक अधिवेशन आज पुण्यातील यशदा येथे संपन्न झाले, त्यावेळी मुरुगेश निरानी बोलत होते. 


केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते तर डीएसटीएचे अध्यक्ष शहाजी भड, कार्यकारी सचिव आरती देशपांडे, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, डीएसटीएच्या ६६ व्या वार्षिक संमेलनाच्या आयोजन समितीचे प्रमुख सोहन शिरगावकर, राष्ट्रीय साखर संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन अग्रवाल आणि राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी निवडक सभासद व निमंत्रित कार्यक्रमस्थळी उपस्थित होते तर इतर सर्व सभासद हे ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते. 

यावेळी साखर उत्पादन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करण्याऱ्या डॉ. प्रमोद चौधरी, नरेंद्र मोहन अग्रवाल, कांतिभाई पटेल, बाळकृष्ण जमदग्नी आणि बी. डी. पवार या असोसिएशनच्या सभासदांना जीवन गौरव पुरस्कार तर साखर उद्योगात कार्यरत असणाऱ्या मुरुगेश निरानी, राजाभाऊ शिरगावकर, विद्याधर अनास्कर, रोहित पवार, समरजितसिंह घाडगे आणि हसमुख भाई भक्ता यांना त्यांच्या साखर उद्योगातील योगदानासाठी साखर उद्योग गौरव पुरस्कार देत गौरविण्यात आले. स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. 

साखर उत्पादन व त्याचाशी संबंधित असलेल्या संस्थांकडून उत्पादन, शेती, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन आदी विषयांवर महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यातील संस्थेच्या सभासदांकडून मागविण्यात आलेल्या सर्वोत्तम ४२ शोधनिबंध पुस्तिकेचे प्रकाशन देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वोत्कृष्ट शोध निबंधासाठी दिले जाणारे मंगल सिंह सुवर्ण पदक यंदा मुंबई साखर संघाचे माजी व्यवस्थापकीय संचालक एम. एस. मराठे यांना प्रदान करण्यात आले. 

निरानी पुढे म्हणाले की, देशात उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतून मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होत असले तरीही केवळ महाराष्ट्रामधूनच आज संपूर्ण देशभरात इथेनॉलशी संबंधित प्रोडक्ट्स येत आहेत. देशभरात ६०० हून अधिक साखर कारखाने आहेत यापैकी २०० हून अधिक कारखाने हे एकट्या महाराष्ट्रात तर २०० च्या आसपास कारखाने हे कर्नाटकमध्ये आहेत. ऊस उत्पादन व तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र करीत असलेल्या कामाची दाखल ही देशपातळीवर घेतली जाते. कर्नाटक सरकार देखील त्याचे अनुकरण करते.” 

पुढील दोन वर्षांचा काळ हा देशातील साखर उत्पादकांसाठी सुवर्णकाळ असल्याचे सांगत इथेनॉल निर्मितीमुळे साखरेच्या अधिक उत्पादनामुळे उभ्या राहणा-या समस्या सुटतील, असे शहाजी भड यांनी सांगितले. 

इथेनॉल मॅन व प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांनी यावेळी जैवइंधन या विषयावर स्वर्गीय एस. एन. गुंडू मेमोरीअल लेक्चर सिरीजमध्ये व्याख्यान दिले तर इन्स्टीटयूट ऑफ केमिकल टेक्नोलाॅजिचे कुलगुरू डॉ. ए. बी. पंडित यांनी जे. पी. मुखर्जी मेमोरीअल लेक्चर मध्ये साखर उद्योगाशी संबंधी आपले विचार मांडले.

From Around the web