विद्यार्थ्यांमध्ये 'स्टार्टअप' संस्कृती रुजण्याची गरज

 
विद्यार्थ्यांमध्ये 'स्टार्टअप' संस्कृती रुजण्याची गरज

पुणे : "विद्यार्थ्यांमधील नावीन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक उपक्रम हाती घेतले जात असून, इनोव्हेशन-स्टार्टअप पॉलिसी बनवली आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, आवश्यक संसाधनांअभावी त्यांना पुरेशी संधी मिळत नाही. त्यामुळे महाविद्यालय स्तरावरच त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि संसाधने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. विद्यापीठात आणि महाविद्यालयानी विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन, आंत्रप्रेन्युअरशीप, 'स्टार्टअप' संस्कृती रुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा," असे मत भाऊ इन्स्टिट्यूटचे सहसंस्थापक आणि 'नॅशनल इनोव्हेशन स्टार्टअप पॉलिसी'चे प्रमुख संजय इनामदार यांनी व्यक्त केले.

दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलतर्फे आयोजित ‘नॅशनल इनोव्हेशन स्टार्टअप पॉलिसी'वरील चर्चासत्रात संजय इनामदार बोलत होते. प्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलचे सहायक संचालक दीपन साहू, भाऊ इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय तळेले, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील, आयआयसी समन्वयक डॉ. सीमा तिवारी, विभागप्रमुख डॉ. संगीता जाधव आदी उपस्थित होते.

संजय इनामदार म्हणाले, " संसाधने आणि दृष्टीकोन असे दोन आव्हाने आज आहेत. ग्रामीण भागात संसाधनांचा, तर शहरी भागात दृष्टीकोनाचे आव्हान आहे. चाकोरीबाहेर जाऊन काम करण्याचा दृष्टीकोन विकसित व्हायला हवा. भारताच्या विकासात माझे योगदान असावे, या भावनेतून विद्यार्थी आणि शिक्षकांनी काम केले पाहिजे. आज त्यापद्धतीने काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची, शिक्षकांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात इनोव्हेशन आणि आंत्रप्रेन्युअरशीप विकसित होत आहे. मुलांमध्ये कौशल्य विकसित होण्याला, नवकल्पनांना प्रोत्साहन देत आहोत. बौद्धिक संपदा, स्वामित्व हक्क, रेव्हेन्यू मॉडेल यावरही काम सुरु आहे."

दीपन साहू म्हणाले, "इनोव्हेशन, आंत्रप्रेन्युअरशीप विकसित होण्याला चालना देण्यासाठी कौन्सिल प्रयत्न करत आहे. नव्या भारताचे, तसेच फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न गाठायचे असेल, तर आपल्याला स्टार्टअप, इनोव्हेशन आणि रोजगारनिर्मितीवर भर देण्याची गरज आहे. तसेच बौद्धिक संपदा, पेटंटचे नोंदणी करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. हे धोरण प्रभावीपणे राबवले गेले तर येत्या काळात आपण इस्राईल, अमेरिका सारख्या देशांची बरोबरी करू शकतॊ. त्यासाठी बजेटमध्ये इनोव्हेशनसाठी किमान १ टक्के तरतूद केली पाहिजे."
 
ब्रिगेडियर अभय भट म्हणाले, "आर्मी इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना इनोव्हेशन, संशोधन करण्यासाठी सतत प्रेरित केले जाते. आज अनेक विद्यार्थी उपयोजित संशोधन करताहेत. स्वतःचे स्टार्टअप सुरु करताहेत. स्मार्ट हाकेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये आर्मी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यापुढेही संस्थेत विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना संशोधन, इनोव्हेशन आणि आंत्रप्रेन्युअरशीपसाठी आम्ही प्रोत्साहन देणार आहोत."

From Around the web