कविता वाचकांना अंतर्मनात डोकावायला लावणारी असावी

हृदयस्पर्शी, संवेदनशील प्रतिभेतून साकारते श्रेष्ठ कविता
 
d
डॉ. अश्विनी धोंगडे यांचे प्रतिपादन; राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, काषाय प्रकाशनातर्फे 'त्रिवेणी संगम' 

पुणे : "कवितेतून लोकांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य कवीकडे असते. वाचकांना विचार करायला लावणारी, अंतर्मनात डोकावायला लावणारी ही खरी कविता असते. हृदयस्पर्शी, संवेदनशील प्रतिभेतून साकारलेली कविता समाजमन घडवते," असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका व विचारवंत डॉ. अश्विनी धोंगडे यांनी केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशनाच्या वतीने आयोजित 'बंधुता शब्द क्रांती पुरस्कार', 'शब्द उभा रणांगणी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि निमंत्रित कवींचे शब्दक्रांती कविसंमेलन या 'त्रिवेणी संगम' विशेष कार्यक्रमात डॉ. धोंगडे बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात बुधवारी झालेल्या या कार्यक्रमावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्रा. डॉ. अशोक कुमार पगारिया, डॉ. विजय ताम्हाणे, अरुण बोराडे, संयोजक संदीप कांबळे, प्रा. प्रशांत रोकडे उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यातील पलूसचे रानकवी नामदेव जाधव यांना डॉ. धोंगडे यांच्या हस्ते 'बंधुता शब्दक्रांती पुरस्कार' प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या 'शब्द उभा रणांगणी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. त्यानंतर निमंत्रितांचे कवी संमेलन झाले.

डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, "कोरोना महामारीमध्ये अनेक जवळची माणसे आपण गमावली. वेदनेवर भाष्य करणाऱ्या कविता श्रेष्ठ ठरतात. समाजाचे दुःख पेलण्याची ताकद कवितेमध्ये असते. प्रत्येक कवितेतून काहीतरी विचार द्यायला हवा. नामदेव जाधव व चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या संवेदनशील मनातून या कविता साकारल्या आहेत. त्यांना ईश्वराने दिलेली शब्दांची प्रतिभा अफाट आहे." महाराष्ट्रात काव्यसंग्रहाना फारसा प्रतिसाद मिळत नाही, ही शोकांतीका असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, "पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा 'त्रिवेणी संगम' कार्यक्रम आहे. प्रज्ञा, प्रतिभा, समता या मानवी मुल्यांचा मिलाप या निमित्ताने झाला आहे. समाजामध्ये शस्त्राच्या नव्हे, तर शब्दांच्या बळावर अनेक क्रांती झाल्या आहेत. समाजातील अस्पृश्यतेचा अंधकार नाहिसा करत 'आम्ही भारतीय आहोत' हा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि इतर क्रांतीकारकांनी दिला. माणुसकी हाच साहित्यिकाचा धर्म असतो."

नामदेव जाधव यांनी पुरस्कार स्वीकारताना हा सन्मान कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि रानमातीचा असून, या सर्वाना हा पुरस्कार समर्पित करतो, असे सांगितले. डॉ. अशोक कुमार पगारिया, अरुण बोराडे, चंद्रकांत वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत-प्रास्ताविक डॉ. विजय ताम्हाणे यांनी केले. सूत्रसंचालन शंकर आथरे यांनी केले. आभार संदीप कांबळे यांनी मानले.
 

From Around the web