...तर महिलाही बनतील लष्करप्रमुख

पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीत (एमडीए) लवकरच मुलींनाही प्रवेश मिळणार आहे. आगामी काळात लष्करात महिला अधिकारींचा सहभाग वाढणार आहे. त्यामुळे येत्या तीस ते चाळीस वर्षांत लष्करप्रमुखपदाची धुरा कदाचित एखाद्या महिला अधिकारीकडे जाईल, असा विश्वास लष्करप्रमुख जनरल एम एम नरावणे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 141 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा शुक्रवारी (दि.29) संपन्न झाला. याप्रसंगी तीन वर्षे प्रबोधिनीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी लष्करी शिस्तीत दिमाखदारपणे संचलन केले. प्रशिक्षणार्थींचे पालक, निमंत्रित मान्यवर, लष्करी अधिकारी हे मर्यादित प्रमाणात उपस्थित होते.
या संचलन सोहळ्याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना जनरल नरवणे म्हणाले,"" सध्या लष्कराच्या गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी येथे महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. लष्करात विविध पदांवर महिला कार्यरत आहेत. त्यातच एनडीएमध्येदेखील मुलींना प्रवेशाचे द्वार खुले झाले आहे. याद्वारे स्त्री-पुरूष समानतेकडे सैन्याने एक पाऊल पुढे टाकले आहे. आगामी काळात सैन्य दलातील अनेक महतवपूर्ण पदावर महिला अधिकारी कार्यरत राहतील. त्याचबरोबर पुढील काळात लष्करप्रमुख पदाची धुरा देखील एका महिला अधिकारीकडे जाईल, असा विश्वास मला वाटत आहे.''
एनडीएमध्ये मुलींसाठी काही महत्वाच्या पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. मात्र त्याचवेळी प्रशिक्षण कार्यक्रमात कोणताही बदल केला जाणार नाही. प्रबोधिनीत मुलींनाही मुलांप्रमाणेच प्रशिक्षण दिले जाईल, असेही जनरल नरावणे यांनी स्पष्ट केले.