'एआयटी'मध्ये उभारणार विद्यापीठाचे संशोधन केंद्र

पुणे: "नवीन शिक्षण धोरणात संशोधन, इनोव्हेशन, सर्वांगीण शिक्षण, आंतर-बहुशाखीय शिक्षण आदींचा अंतर्भाव आहे. संशोधनाधारित आणि चौकटीबाहेरचे, तसेच विद्यार्थ्याला आवडीचे शिक्षण घेण्याला प्रोत्साहन मिळावे. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे असलेला कल पाहता लवकरच येथे विद्यापीठाच्या सहयोगाने संशोधन केंद्र उभारण्यात येईल. त्यातून मुलांच्या संशोधनाला चालना मिळेल व आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल," असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.
दिघी येथील आर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) २७व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. करमळकर बोलत होते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-आयसीएमआर) साथरोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांना जीवनगौरव पुरस्कार, तर 'एम तत्व' आणि सिम्बो.एआय' कंपनीचे सहसंस्थापक बलजीत सिंग व प्रवीण प्रकाश यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. गंगाखेडकर, सदर्न कमांडचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, लेफ्टनंट जनरल डी. एस. अहुजा (एव्हीएसएम) ऑनलाईन सहभागी झाले होते. तर 'एआयटी'च्या कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला 'एआयटी'चे संचालक ब्रिगेडियर अभय भट, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील आदी उपस्थित होते. डॉ. गंगाखेडकर यांच्या वतीने डॉ. बी. पी. पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला.
डॉ. नितीन करमळकर म्हणाले, "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नेहमीच संशोधनाला प्राधान्य देत आहे. त्याचाच भाग म्हणून विद्यापीठात एसीपीपीयू रिसर्च पार्क उभारले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषिक्षेत्र, इलेक्ट्रिकल मोबेलिटी, आरोग्यसेवा, पाणी आदी क्षेत्रात काम सुरु आहे. विद्यार्थ्यांना इनोव्हेशन, स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देत आत्मनिर्भर बनविण्याचा, तसेच रोजगार निर्मिक बनविण्याचा प्रयत्न आहे. 'एआयटी' विद्यापीठांशी संलग्न माझीच संस्था आहे. त्यामुळे डॉ. गंगाखेडकर यांना जीवनगौरव प्रदान करताना मलाही आनंद होतो आहे. तक्षशिला, नालंदा विद्यापीठांप्रमाणे गुरुकुल पद्धतीचे शिक्षण आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचे शिक्षण द्यायला हवे."
जीवनगौरव पुरस्कार स्वीकारत आनंद व्यक्त करून डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, "लष्कराची शिस्त इथल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्येही दिसत आहे. माझीही लष्करी सेवेत जाण्याची इच्छा होती. मात्र शक्य झाले नाही, नागरी सेवेत आलो. साथरोग तज्ज्ञ म्हणून कोविड व्यवस्थापन करताना नवीन गोष्टी शिकत संशोधन करत होतो. जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरू न देता यावर काम करणे गरजेचे असल्याने हे आव्हान सोपे नव्हते. काहीअंशी ही जबाबदारी पार पाडण्यात यश आले असावे. कोरोनाने अनेक गोष्टी शिकवल्या. आर्थिक बाजू भक्कम करण्यासह स्वतःची, कुटुंबीयांची काळजी घेणेही महत्वाचे असल्याचे अधोरेखित झाले. लोकांमधील संवेदनशीलता जागृत झाली. आपण सुरक्षित, तर आजूबाजूचे वातावरण सुरक्षित, हे समजले. आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. या काळात देशाच्या नेतृत्वाकडून, जनतेकडून खूप सहकार्य मिळाले."
बलजीत सिंग म्हणाले, "या सन्मानाबद्दल 'एआयटी' परिवाराचे आभार मानतो आणि 'सिम्बो'च्या टीमला हा सन्मान समर्पित करतो. त्यांचे योगदान मोलाचे आहे. प्रामाणिक प्रयत्नातून आम्ही ध्येय साकार करण्याचा प्रयत्न करत आहोत." प्रवीण प्रकाश म्हणाले, "माझ्यासाठी हा सर्वोत्तम पुरस्कार आहे. 'एआयटी'ने आम्हाला घडवले. विविध कौशल्यांसह चांगला अभियंता बनवले. माझ्या यशात सर्वांचे योगदान आहे. चांगल्या कामातून आम्ही संस्थेचे नाव आणखी उंचीवर नेऊ."
हिमांशू या विद्यार्थ्यास 'ऑलराउंडर बेस्ट स्टुडंट'चा, तर दिव्या भारती हिला 'बेस्ट गर्ल स्टुडंट अकॅडमिक'चा फिरता करंडक, आर्या कुशवाह हिला खेळासाठी जी. राजशेखर मेमोरियल पुरस्कार मिळाला. यासह टाटा, झेडएस असोसिएट, पर्सिस्टंट फाउंडेशन, हॉरिझॉन ग्रुप, बडवे ग्रुप, हॅशमॅप, उडचलो ग्रुप, इंडियन एक्सप्रेस यांनी उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रायोजित केलेली पारितोषिके विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आली. यामध्ये डॉ. गणेश मुंडे, डॉ. संगीता जाधव, गीता पाटील, युवराज घोलप, डॉ. यु. व्ही. अवसरमल, आर. एस. वर्मा, राघू बाबर, दिलीप सिंग यांचा, तर सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून डॉ. सीमा तिवारी यांचा गौरव करण्यात आला. ब्रिगेडियर अभय भट यांनी संस्थेच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले, तर कर्नल के. ई. विजयन यांनी आभार मानले.