“क्या हुआ तेरा वादा’…?

पुणे- मागील महापालिका निवडणुकीत पुणेकरांना सत्ताधारी भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नसल्याचा दावा करत शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यात येणार आहे. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून “क्या हुआ तेरा वादा…’ ही प्रश्न मालिका सुरू करण्यात आली आहे. तसेच, प्रश्नांच्या माध्यमातून भाजपच्या अपयशाचा पाढा वाचणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
जगताप म्हणाले की, पुणे महापालिकेत पुणेकरांनी भाजपला ऐतिहासिक बहुमत दिले होते. मात्र, या बहुमताचा वापर पुण्याच्या विकासासाठी करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र, भाजपचे वायदे म्हणजे “बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ अशी ठरली. भाजपच्या या “मुंगिरीलाल’च्या स्वप्नांनी जाणीव पुणेकरांना करुन देणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कर्तव्य आहे, असे जगताप यांनी सांगितले.
जगताप म्हणाले की, समान पाणी योजना, स्मार्ट सिटी, पुणे मेट्रो, भामा आसखेड योजना, असे प्रकल्प राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात प्रत्यक्षात सुरू झाले. हे क्रेडीट सत्ताधाऱ्यांचे नाही. हे पाहता ज्या पुणेकरांनी 2017 मध्ये भाजपचे 98 नगरसेवक निवडून दिले, त्या पुणेकरांचा निश्चितच भ्रमनिरास झाला आहे.
आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. मात्र, त्या सोबतच निवडणूक स्वबळावर लढायचीही आमची तयारी आहे. सत्ताधाऱ्यांचे शहराबाबत चुकलेले धोरण, सत्ताधारी नगरसेवकांचे निष्क्रीय कामकाज या सगळ्या गोष्टी तसेच आम्ही या पूर्वी केलेला विकास तसेच पुण्याच्या शाश्वत विकासाच्या संकल्पना घेऊन आम्ही पुणेकरांसमोर जाणार, आम्ही सर्व आघाडी पक्ष निवडणूक जिंकायची या एकाच हेतूने लढणार आहोत. त्यामुळे ती सन्मानाने होईल. जागा वाटप होताना, मागील निवडणुकांच्या मतांच्या आधाराद्वारे प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा वाटप असेच धोरण स्विकारले जाईल. आघाडीची चर्चा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत घेऊन न जाता प्रत्येक वेळेस उमेदवारीबाबत होणारा सावळा गोंधळ टाळण्यासाठी दिवाळीनंतर अवघ्या महिन्याभरात आघाडी होणार की नाही. झाल्यास कोण किती जागा लढवेल, हे स्पष्ट होईल असेही जगताप म्हणाले.
वाट चुकलेले पुन्हा घरी येतील…
महापालिका निवडणुकीत 2017 मध्ये राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांतून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. यावेळी अनेक वाट चुकलेले पुन्हा पक्षात येतील, असा दावा जगताप यांनी केला आहे. त्यासाठी नियोजन झालेले असून योग्य वेळी परत येतील, असे सूचक वक्तव्य जगताप यांनी केले.