तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार , पण माझं 'नो कमेंट' उत्तर !

उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांच्या प्रश्नांना वैतागले
 
ajit pawar

पुणे : जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासंदर्भात सातत्याने होणाऱ्या आरोपांना कंटाळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सविस्तपणे पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या आल्या. मी अनेकदा उत्तर देणं टाळलं. वस्तुस्थिती समोर यावी म्हणून आज बोलत आहे. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली, मात्र त्यात काहीही निष्पन्न झालं नाही. साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप केले जात आहेत, 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार हा खोटा आरोप आहे. यात बेईमानी काहीच झालेली नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. काही प्रश्नांवर मात्र ते वैतागलेले दिसले.

जरंडेश्वर साखर कारखान्याबाबबत सतत माझ्या कुटुंबांचा सतत उल्लेख केला जातो. मला लोकांना सांगायचंय की मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा बॅंकेने जरंडेश्वर साखर कारखान्याने थकलेले पैसै न भरल्याने कारखान्याचा ताबा घेतला.जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीमधे कोणताही गैरव्यवहार झालेला नाही असं सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी म्हटलं आहे, असं  अजित पवारांनी सांगितलं.


अजित पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर प्राप्तिकर खात्याने नुकतीच छापे मारून कारवाई केली. त्याबद्दल विचारले असता त्यांनी या संस्थांनी जरूर ती चौकशी करावी. यातून खरे तेच बाहेर येईल. `तुम्ही पहाटे भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले आणि त्यानंतर भाजपची साथ सोडली. त्यामुळे तुमच्यावर छापे पडत आहेत का, या प्रश्नावर त्यांनी त्रागा व्यक्त करत असले फाल्तू प्रश्न विचारू नका, असे सांगितले. मी कोणाबरोबर जायचे किंवा नाही, हा माझा निर्णय आहे. हा निर्णय घ्यायचा अधिकार मला आहे. हे तरी तुम्हाला मान्य आहे का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

तुम्ही पत्रकार मंडळी हा काय म्हणतो त्यावर मला विचारता आणि मी काय म्हणतो त्यावर दुसऱ्याला विचारता. तुम्हाला दुसरे काय काम आहे, असे म्हणत इतर कारखान्यांच्या विक्रीबाबत तुम्ही कधी इतरांना प्रश्न केले का, अशा प्रतिसवाल केला. मी ही माहिती मुंबईतील पत्रकारांना देऊ शकत होतो. पण पुण्यातील पत्रकारांना द्यावी म्हणून येथे माहिती देतोय, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.


भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे नाव न घेता त्यांनी काही लोकांना उद्योग नसल्याने ते चुकीची माहिती पसरवत आहेत. त्यासाठीत्यांनी सीए आणि वकिल नेमले आहेत. त्यांचा इकडून आणि तिकडून दौरा सुरू आहे. प्रत्यक्षात त्यांना हाती काही लागत नाही. ते पुणे जिल्हा बॅंकेत गेले. ती बॅंक तर व्यवस्थित सुरू आहे. पारनेर कारखान्यावर ते जाऊन आले. त्याचे पुढे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. आणखी दहा कारखान्यांचे टेंडर निघाले. ते भरा. ते भरायला कोणी मनाई केली आहे का? कारखाने चालवणे हे काही येरागबाळ्याचे का नाही, असेही त्यांनी आवर्जून केले. सोमय्या यांच्याविरोधात न्यायालयात जाऊन कारवाई करणार का, या प्रश्नावर त्यांनी मला तेवढाच उद्योग नाही. माझा तसा स्वभाव नाही. आपण भले आणि आपले काम भले, अशी माझी वृत्ती आहे. शहाण्याने न्यायालयाची कोर्टाची पायरी चढू नये, असे आपल्याला लहानपणी शिकवले जाते, याचीही आठवण त्यांनी करून दिली.


 

From Around the web