खेड तालुक्यातील रिंगरोड व रोपवे मार्ग कामांना केंद्रीय मार्ग निधीतून ५६ कोटी रुपयांची मान्यता 

 
खेड तालुक्यातील रिंगरोड व रोपवे मार्ग कामांना केंद्रीय मार्ग निधीतून ५६ कोटी रुपयांची मान्यता

पुणे - पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान मंदिर रिंगरोड (धामणटेक ते मंदिर, मंदिर ते निमगाव गावठाण ते दावडी व पुन्हा धामणटेक) असा रिंगरोड व रोपवे मार्ग या कामांना केंद्रीय मार्ग निधीतून ५६ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

खंडोबा मंदिर पायथ्याशी सुसज्ज असे हेलिपॅड व रेस्ट हाऊस तसेच खंडोबा मंदिर पायथ्याशी रोपवे स्टेशनशेजारी भव्य बगीचा, स्वच्छतागृह, भक्त निवास, वृक्षारोपण त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये हायमॅक्स लाइट इत्यादी सुविधा करण्यात येणार आहेत.

खेड ते मंदिर खरपुडी मार्गे रस्ता व पिंपळगाव ते दावडी मार्गे मंदिर रस्ता हेदेखील होणार आहे. रिंगरोडच्या कामांमुळे खंडोबा देवस्थान हे पुणे-नाशिक व पुणे-नगर या दोन राष्ट्रीय महामार्गांना अत्यंत जवळच्या मार्गाने जोडले जाणार आहे. 

तसेच भीमाशंकर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव ही अष्टविनायक व ज्योतिर्लिंग क्षेत्रे व यमाई देवस्थान, कनेरसर खंडोबा देवस्थानाशी जवळच्या अंतराने जोडली जाणार आहेत. प्रस्तावित रोप-वेमुळे वयस्कर आणि दिव्यांग लोकांना खंडोबा देवस्थान देवदर्शन सहज शक्य होणार आहे. 

या कामांमुळे खेड तालुक्यातील पर्यटन, औद्योगिक व कृषी क्षेत्रांच्या विकासास  मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले. 

From Around the web