नाना पटोले लहान माणूस 

लहान माणसांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही  -  शरद पवार
 
s

पुणे- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टोला मारला आहे. लहान माणसांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही असे पवार यांनी म्हटले आहे. बारामती येथे ते  बोलत होते. 

महाविकास आघाडीत पाठीत सुरा खुपसला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी बिघाडीच्या मार्गाने जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी पटोले यांना टोला लगावला आहे. नाना पटोले यांच्यासारखी माणसं लहान आहेत, त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही, असं ते म्हणाले आहेत. 

या गोष्टीत मी पडत नाही. ती लहान माणसं आहेत त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो, असं म्हणत शरद पवार यांनी नाना पटोले यांना टोला लगावला. नाना पटोले वारंवार स्वबळाचा नारा देत आहे. पण, त्यांनी लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना, ते सोबत राहून पाठीत सुरा खुपसताहेत असं गंभीर वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचं दिसून आलंय.

लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो, मग मी बोललेलं का खुपतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. पुण्याचे पालकमंत्री आपलं काम करत नाहीत. त्यामुळे पुढील पुण्यातील पालकमंत्री आपलाच होईल अशी शपथ घ्या, असं ते म्हणाले. आपण काही बोलायचं नाही, पण तो त्रास आपली ताकद बनवा. मी स्वबळावर म्हणालो होतो, यावर मी माघार घेणार नाही. त्याच्यामुळे आपण कामाला लागा. आपला माणूस खूर्चीवर बसायला हवा, असं पटोले म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

From Around the web